नेता (१/३)
– बंधूंनो आणि मित्रांनो, मी तुम्हा सर्वांची भाषणं ऐकली आहेत, आणि तुम्ही आता माझं ऐकावं अशी मी विनंती करतो. जोवर आपण या ओसाड प्रदेशातच राहत आहोत तोवर आपल्या या सर्व चर्चा आणि वादविवाद व्यर्थ आहेत. या रेताड जमिनीमध्ये आणि या खडकांमध्ये जेव्हा पाऊस होता त्यावेळीही काही पिकू शकलं नाही, तर आताच्या, सर्वात तीव्र असलेल्या या दुष्काळात इथे काहीही पिकणं अगदीच अशक्य आहे. आपण किती वेळ असे एकत्र येऊन आपली रडगाणी गाणार आहोत? गुरं अन्नाशिवाय मरत आहेत, आणि लवकरच आपल्याला आणि आपल्या मुलांनाही खायला मिळणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा उपाय शोधला पाहिजे जो उत्तम आणि अमलात आणण्याजोगा असेल. मला वाटतं आपण ही उजाड जमीन सोडून बाहेरच्या जगात गेलं पाहिजे जिथे चांगली आणिसुपीक माती असेल, कारण अशा अवस्थेत तर आपण फार काळ जगू शकणार नाही.
अशाप्रकारे एका ओसाड भागातला एक रहिवासी एका सभेमध्ये अगदी थकलेल्या आवाजात बोलला होता. कधी आणि कुठे हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा की असं कुठल्यातरी प्रदेशात फार काळापूर्वी घडलं होतं, आणि तेच महत्त्वाचं आहे. खरंसांगायचं तर, एकदा मला वाटू लागलं की ही गोष्ट मीच तर तयार केलेली नाही ना, पण हळूहळू मी स्वतःला त्या विचित्र विचारातून मुक्त केलं. आता माझा ठाम विश्वास आहे की मी या कधीतरी कुठेतरी प्रत्यक्षात होऊन गेलेल्या घटनेचा इथे संदर्भ देऊ शकतो जी मी अजिबात माझ्या कल्पनेतून तयार केलेली नाही.
आपले हात खाली ठेवून, खिन्न, गोंधळलेल्या नजरेने पाहत,उदास व निस्तेज चेहर्याने समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहर्यावर या विद्वत्तापूर्ण शब्दांमुळे थोडी तरतरी दिसू लागली. सगळेजण लगेच कल्पनेत हरवून गेले की ते एका जादुई, स्वर्गीय प्रदेशामध्ये आहेत जिथे जीवतोड मेहनतीचं फळ म्हणून खूप जास्त पीक मिळत आहे.
– बरोबर आहे! बरोबर आहे! – सर्व बाजूंनी थकलेल्या आवाजात कुजबूज सुरू झाली.
– ही जागा कुठे जवळ आहे का? – एका कोपर्यातून हळूच आवाजात प्रश्न विचारला गेला.
–बंधूंनो! – अजून एकजण काहीशा खणखणीत आवाजात बोलू लागला. – आपण लगेचच हा सल्ला अंमलात आणला पाहिजे कारण आपण असे फार काळ जगू शकणार नाही. आपण खूप परिश्रम करून स्वतःला त्रास करून घेतला, तरीही काही फायदा झाला नाही. आपण पेरणी केली ज्यातून आपल्याला काहीतरी खायला मिळू शकलं असतं पण पूर आला आणि मातीसकट सर्वकाही वाहून घेऊन गेला, ज्यामुळे आता फक्त हे खडक उरले आहेत. आपण सकाळ संध्याकाळ परिश्रम करूनही तहानलेले आणि भुकेलेलेच आहोत, विवस्त्र आणि अनवाणीच आहोत. तरीही आपण इथेच राहायचं का? आपल्याला इथून बाहेर पडून चांगली सुपीक जमीन शोधली पाहिजे जिथे आपल्या परिश्रमांचं फळ म्हणून आपल्याला भरभरून पीक मिळेल.
– चला! लवकर चला! कारण ही जागा आता राहण्यालायक राहिली नाही आहे.
कुजबूज वाढू लागली, आणि प्रत्येकजण चालू लागला,आपण कुठे जातोय हे न पाहताच.
– थांबा, बंधूंनो! कुठे जाताय तुम्ही?– पहिला वक्ता पुन्हा बोलू लागला. – हो, बाहेर जायचंच आहे, पण असं जायचं नाहीय. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण कुठे जातोय. नाहीतर आपण यापेक्षाही कठीण परिस्थितीमध्ये अडकू. मला वाटतं आपण एक नेता निवडला पाहिजे, ज्याचं सर्वांना ऐकावं लागेल आणि जो आपल्याला सर्वात उत्तम आणि अचूक मार्ग दाखवू शकेल.
– हो, निवडा! लगेच कोणालातरी निवडा! – चहूबाजूंनी आवाज येऊ लागला.
पण यावेळी आवाज वाढू लागला, गोंधळ झाला. प्रत्येकजण बोलत होता आणि कोणीच ऐकत किंवा ऐकू शकत नव्हतं. ते वेगवेगळ्या गटांत विभाजित होऊ लागले, प्रत्येकजण स्वतःशीच बोलत होता आणि नंतर हे गटसुद्धा विभागले गेले. आता दोघादोघांच्या जोड्यांमधून लोक बोलू लागले, आपलं म्हणणं पटवून देऊ लागले, एकमेकांच्या हातांना धरून खेचू लागले, आणि आपल्या हातांनी दुसर्यांना शांत राहण्याच्या खुणा करू लागले. सर्वजण एकत्र आले, अजूनही बोलत.
– बंधूंनो! – अचानक एक खणखणीत आवाज घुमला, ज्यामुळे बाकीचे कुजबुजणारे, निस्तेज आवाज विरून गेले. – आपल्याला अशाप्रकारे काहीच ठरवता येणार नाही. प्रत्येकजण बोलतो आहे आणि कोणीच ऐकत नाहीय. आपल्याला एक नेता निवडायचा आहे. आपल्यातून आपण कोणाला निवडू शकतो? आपल्यातल्या कोणी इतका प्रवास केला आहे ज्याला रस्ते माहीत असतील? आपण सगळे एकमेकांना चांगले ओळखतो, पण तरीही मी स्वतःला आणि माझ्या मुलांना इथल्या कोणाच्याही नेतृत्वाखाली ठेवू शकत नाही. त्यापेक्षा, मला सांगा आज सकाळपासून त्या रस्त्याच्या कडेला सावलीत बसलेल्या त्या प्रवाशाला कोण ओळखतं?
शांतता पसरली. सगळे त्या अनोळखी व्यक्तीकडे वळले आणि त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळू लागले. मध्यमवयीन, खिन्न चेहरा, जो वाढलेल्या केस आणि दाढीमुळे नीट दिसतही नव्हता असा तो प्रवासी तसाच शांत बसून राहिला, विचारात हरवून जाऊन मध्येच आपली मोठी काठी जमिनीवर आपटत होता.
– काल मी त्याच माणसाला एका लहान मुलाबरोबर पाहिलं होतं. त्यांनी एकमेकांचा हात पकडला होता आणि रस्त्यावरून चालत जात होते. आणि काल रात्री तो मुलगा गाव सोडून गेला पण हा माणूस इथेच थांबला.
– बंधू, या क्षुल्लक गोष्टींवर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीय. तो जो कोणी असेल तो फार दूरवरून इथे आला आहे कारण आपण कोणीच त्याला आधी पाहिलं नाहीय. आणि त्याला इथून जाण्याचा सर्वात अचूक रस्ता नक्कीच माहीत असेल. मला असं जाणवतंय की तो खूप ज्ञानी मनुष्य आहे कारण तो शांतपणे तिथे बसून विचार करतो आहे. दुसरं कोणी असतं तर इतक्यात दहा वेळा त्याने आपल्या बोलण्यात व्यत्यय आणला असता किंवा इतक्यात आपल्यातल्या कोणा एकाशी बोलूसुद्धा लागला असता. पण तो बराच वेळ तिथे एकटाच बसून आहे आणि काहीच बोलत नाहीय.
– तो शांतपणे बसला आहे म्हणजे अर्थातचतोगहन विचार करतो आहे. तो नक्कीच एक ज्ञानी मनुष्य असला पाहिजे. – बाकीच्यांनी दुजोरा दिला आणि पुन्हा त्या माणसाचं निरीक्षण करू लागले. प्रत्येकाला त्याच्यामध्ये तो खूप बुद्धिमान असल्याची खात्री करून देणारा काहीतरी वेगळा गुण दिसत होता.
बोलण्यात अजून जास्त वेळ घालवायचा नव्हता, म्हणून शेवटी सर्वांनी ठरवलं की या प्रवाशालाच जाऊन विचारावं, ज्याला देवाने त्यांना नवी सुपीक जमीन शोधण्यात मदत व्हावी म्हणून पाठवलं आहे असं त्यांना वाटत होतं. तोच त्यांचा नेता बनला पाहिजे आणि ते काहीही प्रश्न न विचारता म्हणणं ऐकतील.
त्यांनी त्यांच्यातल्या दहा जणांना निवडलं जे त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्यांचा निर्णय सांगणार होते. त्याला त्यांच्यावर आलेल्या दयनीय परिस्थितीची माहिती करून देणार होते आणि त्यांचा नेताबनण्याची विनंती करणार होते.
म्हणून दहा जण पुढे गेले आणि त्याच्यासमोर नम्रतापूर्वक झुकले. त्यांच्यातला एकजण तिथली नापीक जमीन, दुष्काळी वर्षं आणि त्यांच्या करूणाजनक परिस्थितीबद्दल बोलू लागला. त्याने त्याचं बोलणं असं पूर्ण केलं:
– या परिस्थितीमुळे आम्हाला आमचं घर आणि आमची जमीन सोडून बाहेरच्या जगात चांगल्या जमिनीच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. यावेळी जेव्हा आम्ही एका निर्णयापर्यंत पोहोचलो तेव्हा देवानेच आमच्यावर कृपा केली असं दिसतंय. कारण त्याने तुम्हाला पाठवलंय. एका ज्ञानी आणि बुद्धिमान मनुष्याला. जो आमचं नेतृत्व करून आमची या संकटातून सुटका करेल. इथल्या सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही तुम्हाला आमचा नेता बनण्याची विनंती करतो. तुम्ही जिथेही जाल, आम्ही सोबत येऊ. तुम्हाला रस्ते माहीत आहेत, आणि नक्कीच एखाद्या चांगल्या प्रदेशात तुमचा जन्म झाला असेल. आम्ही तुमचं नीट ऐकू आणि तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू. तर हे ज्ञानी मनुष्या, तुम्ही इतक्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार आहात का? तुम्ही आमचा नेता बनाल का?
या विनंतीपूर्ण भाषणामध्ये त्या ज्ञानी माणसाने एकदाही त्याचं डोकं वर उचललं नाही. संपूर्ण वेळ तो तसाच बसला होता जसं त्यांनी त्याला पाहिलं होतं. त्याचं डोकं खाली झुकलं होतं, कपाळावर आठ्या होत्या, आणि तो काहीच बोलला नाही. तो फक्त वेळोवेळी त्याची काठी जमिनीवर आपटत विचार करत होता. जेव्हा हे भाषण संपलं तेव्हा तो जराही न हलता तुटकपणे म्हणाला:
– हो.
– मग आम्ही तुमच्यासोबत येऊन नवीन जागा शोधू शकतो का?
– हो. – मान वर न करता त्याने उत्तर दिलं.
सर्वांमध्ये उत्साह पसरला सगळे त्याचे आभार मानू लागले, पण तो मनुष्य त्यांच्याशी काहीही बोलला नाही.
ते दहा जण परत येऊन सर्वांना ही चांगली बातमी सांगू लागले आणि म्हणाले की आताच त्यांना या मनुष्याच्या महान बुद्धिमत्तेचा साक्षात्कार झाला.
– तो त्याच्या जागेवरून हलला सुद्धा नाही किंवा आपण कोणाशी बोलतोय हेही त्याने पाहिलं नाही. तो शांत बसून विचारच करत राहिला. आम्ही इतकं बोललो आणि त्याचं कौतुक केलं पण तो फक्त दोन शब्दच बोलला.
– महान मनुष्य! विलक्षण बुद्धिमत्ता! – सर्वजण आनंदाने ओरडू लागले आणि म्हणू लागले की प्रत्यक्ष देवानेच त्यांना वाचवण्यासाठी या महान मनुष्याला स्वर्गातून या प्रदेशात पाठवलं आहे. सर्वांना खात्री झाली की जगातील कोणत्याही गोष्टीमुळे मानसिक शांती भंग होऊ न देणार्या अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली त्यांना नक्कीच यश मिळेल. आणि त्यांनी दुसर्याच दिवशी पहाटे त्या प्रदेशातून निघण्याचा निर्णय घेतला.