नेता (२/३)
दुसर्या दिवशी, ज्यांच्यामध्ये दूरच्या प्रवासावर जाण्याचं धैर्य होतं असे लोक एकत्र आले. दोनशेहून अधिक कुटुंबं ठरवलेल्या ठिकाणी एकत्र जमली. फक्त मोजकेच जण जुन्या वसाहतीची देखभाल करण्यासाठी मागे थांबले.
या दुःखी लोकांच्या मोठ्या समूहाची अवस्था खूपच करुणाजनक होती. दुर्दैवाने त्यांना तो प्रदेश सोडून जावं लागत होतं जिथे ते लहानाचे मोठे झाले होते, जिथे त्यांच्या पूर्वजांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांचे चेहरे निस्तेज, थकलेले आणि उन्हाने रापलेले दिसत होते. कित्येक वर्षांच्या जीवतोड मेहनतीचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येत होता. त्यातून त्यांच्या दुःखाची आणि नैराश्याची कल्पना येत होती. पण याच क्षणी त्यांच्यात आशेचा एक किरणही दिसत होता – त्यात घराची आठवण सुद्धा होती. एका वृद्ध रहिवाशाच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळला आणि पुढे असलेल्या कठीण भविष्याच्या विचारानेच त्याने एक उसासा टाकला. त्याला चांगली जागा शोधण्यापेक्षा काही काळ इथेच राहून या दगडांमध्ये मरून जाणं चालणार होतं. बऱ्याच स्त्रिया शोकाकुल होऊन त्यांच्या मृत सोयऱ्यांच्या अंतिम स्थळाचा निरोप घेत होत्या.
पुरुष शूर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत होते आणि ओरडत होते, – तुम्हाला या शापित भागातील या झोपड्यांमध्ये राहून भुकेने मरून जायचं आहे का? – खरंतर त्यांना या दुर्दैवी भागातील आणि या गरीब झोपड्यांतील चांगल्या त्या सर्व गोष्टी आपल्या सोबत घेऊन जाणं आवडलं असतं, पण ते शक्य नव्हतं.
लोकांच्या समूहात असतो तसाच नेहमीचा गोंधळ इथे सुद्धा सुरूच होता. पुरुष आणि स्त्रिया दोघेही बेचैन होते. लहान मुलं त्यांच्या आयांच्या पाठीवरील पाळण्यांमध्ये केकाटत होती. त्यांचे प्राणी सुद्धा काहीसे अस्वस्थ होते. गुरं जास्त नव्हतीच, एखाददुसरं वासरू होतं. एक बारीकसा केसाळ घोडा होता ज्याचं डोकं मोठं आणि पाय जाडे होते. त्याच्यावर सर्वांनी जुन्या चादरी, पिशव्या आणि दोन गाठोडी टाकली होती. इतक्या वजनामुळे त्या प्राण्याचा तोल जात होता. तरीही तो ताठ उभा राहून वेळोवेळी खिंकाळत सुद्धा होता. बाकीच्यांनी गाढवांवर सामान लादलं होतं, मुलं कुत्र्यांना पकडून ठेवत होती. बोलणं, ओरडणं, शिव्या देणं, रडणं, भुंकणं, खिंकाळणं – सर्वकाही वाढत होतं. गाढव सुद्धा काहीवेळा ओरडलं. पण त्या नेत्याने एकही शब्द काढला नाही, जणू काही त्याचा या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता. खरंच एक ज्ञानी मनुष्य!
तो त्याचं डोकं खाली ठेवून शांतपणे विचारात मग्न होता. एक दोन वेळा बाजूला थुंकला, इतकंच. पण त्याच्या या विलक्षण वागण्यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली की सर्वजण फक्त त्याच्यासाठी अग्नी आणि पाण्यातून जायला तयार झाले असते. खालील संवाद तिथे ऐकू येत होते:
– असा माणूस आपल्याला भेटलाय याचा आनंद झाला पाहिजे. असं बोलू नये, पण जर त्याच्याशिवाय आपण निघालो असतो तर पुढे जाऊन मरून गेलो असतो. तो खरा बुद्धिमान आहे, मी सांगतोय ना! तो किती शांत आहे, अजून एक शब्दही बोलला नाहीय! – एक जण नेत्याकडे सन्मानाने आणि अभिमानाने पाहत म्हणाला.
– तो बोलेल तरी काय? जो कोणी जास्त बोलत राहतो तो खूप कमी विचार करतो. तो ज्ञानी आहे, हे तर नक्कीच निश्चित आहे! तो फक्त विचार करतो पण काही बोलत नाही, – दुसऱ्याने दुजोरा दिला, आणि तो ही नेत्याकडे आश्चर्याने पाहू लागला.
– इतक्या जास्त लोकांचं नेतृत्व करणं सोपं नाही आहे. त्याला सतत विचार करत राहावं लागतंय करण त्याच्या हातात मोठी जबाबदारी आहे, – पहिला पुन्हा म्हणाला.
निघण्याची वेळ झाली. ते थोडावेळ थांबून अजून कोणी त्यांच्यासोबत येत आहे का ते पाहू लागले, पण कोणी न आल्यामुळे थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता.
– आता निघालं पाहिजे ना? – त्यांनी नेत्याला विचारलं.
तो काहीही न बोलता उभा राहिला.सर्वात हिंमतवान पुरुष काही बरं-वाईट झालं तर त्याच्या जवळ असावं म्हणून लगेच त्याच्या भोवती जमले.
कपाळावर आठ्या आणि मान खाली असलेला तो नेता, आपली काठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तिप्रमाणे हलवत, काही पावलं पुढे गेला. सर्व लोकसुद्धा त्याच्या मागोमाग चालू लागले आणि ओरडू लागले, „आमच्या नेत्याचा विजय असो!“ तो अजून थोडा पुढे गेला आणि गावाच्या सभागृहासमोरील कुंपणावर जाऊन धकडला. तिथे अर्थातच तो थांबला, त्यामुळे बाकीचे लोक पण थांबले. नेता थोडासा मागे आला आणि आपली काठी काहीवेळ त्या कुंपणावर आपटू लागला.
– आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे?-लोकांनी विचारलं.
तो काहीच म्हणाला नाही.
– त्यांना काय विचारतोस? हे कुंपण तोडून टाकलं पाहिजे! हेच आता केलं पाहिजे! तू बघितलंस ना त्यांनी आपल्याला त्यांच्या काठीने सांगितलं काय करायचं ते? – नेत्याच्या जवळ उभे असलेले लोक म्हणाले. – पण प्रवेशद्वार तिथे आहे! – लहान मुलं ओरडू लागली आणि त्यांच्या विरुद्धदिशेला असलेलं प्रवेशद्वार दाखवू लागली.
– श्श! शांत रहा, मुलांनो.
– देवा, मदत कर, हे काय चाललंय? – काही स्त्रिया प्रार्थना करू लागल्या.
– काही बोलू नका. त्यांना माहितीय काय करायचं ते. हे कुंपण तोडून टाका.
क्षणार्धात ते कुंपण मोडून टाकण्यात आलं जसं काही ते तिथे नव्हतंच.
ते कुंपणाच्या पलीकडे आले.
ते जवळजवळ शंभर पावलं चालले असतील इतक्यात नेता एका काटेरी झुडुपावर आदळला आणि थांबला. मोठ्या प्रयत्नाने त्याने स्वतःला तिथून बाहेर काढलं आणि आपली काठी सर्व दिशांना जमिनीवर आपटू लागला. कोणीही हललं नाही.
– आता काय झालं आहे? – मागे असणारे ओरडू लागले.
– हे काटेरी झुडूप कापून टाका! – नेत्याच्या जवळ असणारे लोक म्हणाले.
– पण यावं झुडुपाच्या बाजूनेही वाट आहे! ती बघा तिथे! – लहान मुलं आणि मागे असलेले बरेच लोक सांगू लागले.
– तिथे वाट आहे! तिथे वाट आहे! – नेत्याच्या बाजूला असणारे रागाने वेडावून दाखवू लागले. – आपणच रस्ता सांगू लागलो त्यांना आपल्याला हवं तिथे कसं नेता येईल? प्रत्येकजण इथे आज्ञा देऊ शकत नाही. त्यांनाच सर्वात उत्तम आणि थेट रस्ता माहीत आहे. हे काटेरी झुडूप कापून टाका!
ते झुडुप काढून वाट तयार करण्यासाठी पुढे सरसावले.
– देवा, – एक जण ओरडला ज्याचा हात त्या काट्यांमध्ये अडकून गेला होता आणि अजून एक ज्याच्या चेहऱ्यावर त्या झुडुपाची फांदी लागली.
– बंधूंनो, मेहनत न करता काहीही मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी थोडे परिश्रम तर करावे लागतील. – समूहातील सर्वात हिंमतवान लोक म्हणाले.
बऱ्याच प्रयत्नांनी ते झुडुपातून बाहेर आले आणि पुढे निघाले.
अजून काही अंतर पुढे भटकत गेल्यावर त्यांच्यासमोर वाटेत काही लाकडी ओंडके आले. हे सुद्धा उचलून बाजूला टाकण्यात आले. मग ते पुढे गेले.
पहिल्याच दिवशी त्यांनी खूप कमी अंतर पार केलं होतं कारण त्यांना अशाच प्रकारचे अनेक अडथळे दूर करावे लागले होते. आणि त्यांच्याकडे अन्न सुद्धा खूप कमी होतं. कारण काहींनी फक्त सुके पाव आणि थोडं चीज आणलं होतं आणि काहींनी तर आपली भूक भागवण्यासाठी फक्त पाव आणले होते. काहींकडे काहीच नव्हतं. सुदैवाने उन्हाळा चालू होता म्हणून त्यांना मध्ये मध्ये काही फळांची झाडं मिळत होती.
म्हणून पहिल्याच दिवशी जरी त्यांनी खूप कमी अंतर पार केलं होतं तरी त्यांना खूप जास्त थकवा जाणवला. काही मोठे धोके आले नाहीत आणि अपघातही झाले नाहीत. इतक्या मोठ्या प्रवासामध्ये पुढील गोष्टी खूप सामान्य म्हणूनच गणल्या जातील: एका स्त्रीच्या डाव्या डोळ्यामध्ये काटा रुतला ज्यावर तिने ओला कपडा बांधून ठेवला; एक लहान मूल रडत असताना लाकडी ओंडक्यावर अडकून पडलं; एक वृद्ध मनुष्य ब्लॅकबेरीच्या झुडुपावरून घसरला आणि त्याचा पाय मुरगळला; त्यावर कांदा चोळल्यानंतर तो हिंमतीने वेदना सहन करत, आपल्या काठीचा आधार घेत, अभिमानाने नेत्याच्या पाठीमागून चालू लागला. (खरं सांगायचं तर, बरेच जण म्हणाले की तो वृद्ध मुरगळलेल्या पायाबद्दल खोटं बोलत होता, तो फक्त ढोंग करत होता जेणेकरून त्याला मागे जाता येईल.) काही काळाने, हातात काटे रुतले नाहीयत किंवा चेहरा घासला गेला नाहीय असे फार कमी लोक राहिले. पुरुष हे सर्व काही अभिमानाने सहन करत होते तर स्त्रिया त्यांच्या निघण्याच्या वेळेपासूनच शिव्याशाप देत होत्या. मुलं अर्थातच रडत होती कारण त्यांना या परिश्रमाचं पुढे जाऊन चांगलं फळ मिळणार आहे हे समजत नव्हतं.
पण सर्वांना याचा आनंद होता की नेत्याला काहीच झालं नव्हतं. खरं सांगायचं झालं तर, सगळेच त्याच्या रक्षणासाठी सावध होते, पण तरीही, तो स्वतः सुद्धा नशीबवान होता. पहिल्या रात्री थांबल्यावर सर्वांनी प्रार्थना केली व दिवसाचा प्रवास यशस्वी करून दिल्याबद्दल आणि नेत्याला काहीही इजा न पोहोचवल्याबद्दल देवाचे आभार मानले. नेत्याजवळच्या हिंमतवान पुरुषांपैकी एक जण बोलू लागला. त्याच्या चेहऱ्यावर ब्लॅकबेरीच्या झुडुपामुळे खरचटलं होतं पण त्याने त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.
– बंधूंनो, – त्याने सुरुवात केली.- देवाच्या कृपेमुळे आपण एका दिवसाचा प्रवास यशस्वीरित्या पार पाडला आहे. रस्ता सोपा नाही आहे, पण तरीही आपल्याला पुढे जावं लागेल कारण हा कठीण रस्ताच आपल्याला सुखाच्या दिशेने नेणार आहे. देव आपल्या नेत्याचं रक्षण करो जेणेकरून ते असंच यशस्वीपणे आपलं नेतृत्व करत राहतील.
– जर असंच सुरू राहिलं तर उद्या माझा दुसरा डोळा सुद्धा जाईल! – एक स्त्री काहीशा रागात म्हणाली.
– ओह, माझा पाय! – तो वृद्ध पुरुष म्हणाला, ज्याला त्या स्त्रीच्या बोलण्याने उत्तेजन मिळालं.
लहान मुलं रडत होती, आणि त्यांच्या आया भाषण चालू असल्याने त्यांना शांत बसवत होत्या.
– होय, तुझा दुसरा डोळा सुद्धा जाईल, – वक्ता रागाने भडकून म्हणाला,- आणि जाऊ देत तुझे दोन्ही डोळे! अशा महान कार्यासाठी एखाद्या स्त्रीचे डोळे गेले तर काही नाही होणार. जरा विचार करा! तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य पाहिलं पाहिजे. आपल्यातले अर्धे जण या प्रवासात मेले तरी चालतील! काही फरक पडणार नाही! एका डोळ्याचं काय घेऊन बसलात? आपली काळजी घेणारं आणि आपल्याला सौख्याच्या दिशेने नेणारं कोणीतरी इथे असताना डोळे हवेतच कशाला?आपण काय फक्त तुझ्या एका डोळ्यासाठी आणि या म्हाताऱ्याच्या पायासाठी आपलं ध्येय विसरून जायचं?
– तो खोटं बोलतोय! तो म्हातारा खोटं बोलतोय! त्याला परत मागे जायचं आहे म्हणून तो ढोंग करतोय. – चहुबाजूंनी आवाज येऊ लागले.
– बंधूंनो, ज्या कोणाला पुढे जाण्याची इच्छा नसेल, – वक्ता पुन्हा बोलू लागला, – तो तक्रार करत बसण्यापेक्षा परत जाऊ शकतो. माझ्याबद्दल विचाराल तर, मी या ज्ञानी नेत्याच्या मागून तोपर्यंत जात राहीन जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण उरले आहेत!
– आम्हीही जाऊ! आम्हीही जिवंत आहोत तोवर त्यांच्या मागे जाऊ!
तो नेता शांतच होता.
प्रत्येक जण त्याच्याकडे पाहून कुजबुजू लागला:
– तो विचारांत मग्न झाला आहे!
– ज्ञानी मनुष्य!
– त्याच्या कपाळाकडे पाहा!
– सतत आठ्या पडलेल्या असतात!
– खूप गंभीर!
– तो शूर आहे! त्याच्याकडे बघूनच समजतं.
– बरोबर बोलतोयस तू! कुंपणं, ओंडके, झुडूपं – तो सगळ्यातून मार्ग काढतो. तो फक्त शांतपणे त्याची काठी आपटतो, काहीही न बोलता, आणि आपल्याला समजून घ्यावं लागतं तो काय विचार करत असेल.