सामान्य सर्बियन बैलाचा तर्क
जगामध्ये बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात, आणिबऱ्याच लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, आमचा देश तर आश्चर्यांनी इतका भरून वाहतो आहे की इथे आता आश्चर्यांचं काही आश्चर्यच वाटत नाही. इथे अगदी उच्च पदावर असे लोक आहेत जे काहीच विचार करत नाहीत आणि त्याचं संतुलन म्हणून किंवा कदाचित दुसऱ्या काही कारणामुळे एका सामान्य शेतकऱ्याचा बैल, जो बाकीच्या सर्व सर्बियन बैलांसारखाच आहे, तो विचार करू लागला.कुणास ठावूक, असं काय घडलं ज्यामुळे या प्राण्याला इतकं कठीण काम करावंसं वाटलं. विशेषत:जेव्हापासून असं सिद्ध झालं आहे की सर्बियामध्ये हे दुर्दैवी काम फक्त नुकसानच देऊ शकतं. आपण असं मानूया की या बिचाऱ्या प्राण्याला माहित नव्हतं की या कामामुळे त्याच्या जन्मभूमीमध्येतरी त्याला काहीच फायदा होणार नाही म्हणून आपणसुद्धात्याला काहीही नागरी उत्तेजन देऊया नको पण तरीही हे रहस्य आहेच की एखादा बैल विचार का करू लागला, तो तर मतदार नाही नगरसेवक नाही न्यायाधीश नाही किंवा एखाद्या गुरांच्या लोकसभेमधला कोणी निवडलेला प्रतिनिधी नाही किंवा (ठराविक वय पार झालं असेल तर) संसदेतला खासदार नाही आणि या बिचाऱ्या प्राण्याने जर कधी एखाद्या गुरांच्या देशात मंत्री व्हायचं स्वप्न पाहिलं तर त्याला माहित असायला हवंकी त्याला याउलट शक्य तितका कमीतकमी विचार करावा लागेल, काही आनंदी देशांमध्ये असणाऱ्या उत्कृष्ट मंत्र्यांप्रमाणे;पण आपला देश मात्र याबाबतीत फारसा नशीबवान नाही.शेवटी आपण सर्बिया मधल्या एका बैलाने लोकांनी सोडून दिलेलं काम हाती का घेतलं असेल याची काळजी का करावी?किंवा असंही झालं असेल की तो फक्त आपोआप नैसर्गिकरित्या विचार करू लागला असेल॰
तर हा नक्की कोणत्या प्रकारचा बैल आहे? हा एक सामान्य बैल आहे जसा जीवशास्त्रात शिकवला जातो एक डोकं, शरीर,पाय,बाकीच्या बैलांप्रमाणेच; तो गाडी ओढतो, गवत खातो,मीठ चाटतो, रवंथ करतो आणि हंबरतो.त्याचं नाव आहे ढवळ्या.
तर त्याने विचार करायला सुरुवात कशी केली? एका दिवशी त्याच्या मालकाने त्याला आणि आणि त्याच्या मित्राला,पवळ्याला,जोखडाशी बांधलं. काही चोरलेले ओंडके गाडीमध्ये टाकले आणि ते गावामध्ये विकण्यासाठी निघाला. गावात शिरल्याबरोबर त्यानेलगेच सगळे ओंडके विकले, ढवळ्याला व त्याच्या मित्राला जोखडातून सोडलं, त्यांना बांधून ठेवणारी साखळी अडकवून ठेवली,त्यांच्यासमोर थोडंसं गवत टाकलं आणि आनंदाने एका खाणावळीमध्ये दारू पिऊन तरतरीत व्हायला गेला. त्या गावात एक उत्सव सुरु होता, त्यामुळे तिथे पुरुष, स्त्रिया आणि मुलं सर्व बाजूंनीफिरत होती.पवळ्या, ज्याला बाकीचे बैल काहीसा मंद समजायचे, तो कुठेच पाहत नव्हता.उलट त्याने आपलं जेवण जास्त गंभीरपणे घेतलं, पोटभर खाल्लं,आनंदाने हंबरला आणि खाली बसून डुलक्या घेत रवंथ करू लागला.आजूबाजूने जाणारे सगळे लोक त्याच्या खिजगणतीतही नव्हते. तो शांतपणे डुलक्या घेत रवंथ करत होता (खरंतर तो एक मनुष्य असायला हवा होता, कारण त्याच्याकडे सगळे गुण तर होतेच). पण ढवळ्या एकही घास खाऊ शकला नाही. त्याचे पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावरील दुःखद भाव एका नजरेतच सांगत होते की हा एक विचारवंत, सुंदर आणि प्रभावशाली जीव आहे.सर्बियन लोक त्यांच्या वैभवशाली इतिहासाचा, त्यांच्या नावाचा, त्यांच्या देशाचा अभिमान बाळगत बाजूने जात होते. आणि हा अभिमान त्यांच्या वर्तनामध्ये आणि चालीमध्ये दिसत होता. ढवळ्या हे पाहत होता आणि त्याचं मन मोठ्या अन्यायाच्या भावनेमुळे अचानक दुःखाने व वेदनेने भरून आलं आणि तो या अचानक जाणवणार्या शक्तिशाली भावनेसमोर तग धरू शकला नाही. तो दुःखाने, वेदनेने हंबरू लागला; त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि प्रखर यातनेमध्ये ढवळ्या विचार करु लागला:
– माझे मालक आणि आणि हे बाकीचे सर्बियन कशाबद्दल इतके अभिमान बाळगून आहेत? ते त्यांची मान इतकी उंच का ठेवतात आणि माझ्या लोकांकडे गर्वाने व तिरस्काराने का पाहतात?त्यांना त्यांच्या मातृभूमीचा अभिमान आहे, नशिबाने त्यांना सर्बियामध्ये जन्मता आलं याचा अभिमान आहे. माझ्या आईने मलासुद्धा सर्बियामध्येच जन्म दिला आहे आणि सर्बिया फक्त माझीच मातृभूमी नाही तर माझ्या वडिलांचीही आहे आणि माझ्या पूर्वजांचीही आणि त्यांच्या पूर्वजांचीसुद्धा जे प्राचीन स्लाविकभूमीवरून या प्रदेशात आले होते. पण तरीही आम्हा बैलांना याचा कधी अभिमान वाटला नाही. आम्ही फक्तआमच्याओझी ओढण्याच्या आणि चढवण्याच्या कौशल्याचा अभिमान बाळगला; आज पर्यंत कोणत्याही बैलाने एखाद्या या जर्मन बैलाला सांगितलं नाही की: “तुला माझ्याकडूनकायहवं आहे, मी एक सर्बियन बैल आहे, माझी मातृभूमी सर्बिया आहे, माझे पूर्वज येथे जन्मले होते आणि आणि या भूमीमध्येच माझ्या पूर्वजांच्या मृत्यू झाला आहे.” आम्ही यात कधी अभिमान बाळगला नाही,कधीच हे आमच्या मनात आलं नाही आणि हे तर याबद्दल इतका गर्व बाळगून आहेत. विचित्र लोक!
विचारात हरवलेला असतानाच बैलाने दुःखाने आपली मान हलवली, त्याच्या गळ्यातील घंटा वाजू लागली आणि जोखडाचा आवाज झाला. पवळ्याने डोळे उघडले, आपल्या मित्राकडे पाहिलं, आणि हंबरला:
– तुझा तो फाजीलपणा पुन्हा सुरू झाला वाटतं! खा मुर्खा, थोडी तब्येत बनव, तुझी बाहेर आलेली हाडं बघ; जर विचार करणं चांगलं असतं तर लोकांनी ते आपल्या बैलांसाठी सोडलं नसतं. आपण इतके काही नशीबवान नाही आहोत!
ढवळ्याने आपल्या मित्राकडे सहानुभूतीने पाहिलं, त्याच्यापासून नजर दूर वळवली आणि पुन्हा आपल्या विचारात हरवून गेला.
– ते त्यांच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमान बाळगतात. कोसोवोची जमीन, कोसोवोचं युद्ध याच्या बढाया मारतात.यात काय इतकं, माझ्या पूर्वजांनी सुद्धा अन्नधान्याने आणि शस्त्रास्त्रांनी भरलेल्या गाड्यात्याकाळातओढल्या नाहीत का?जर आम्ही नसतो तर लोकांना ते काम स्वतःहून करावं लागलं असतं. त्यानंतरतुर्क लोकांच्या विरोधात उठाव झाला. एक महान आणि धाडसी कामगिरी,पण त्यावेळी तिथे कोण होतं? हे आता माझ्यासमोर नाक वर करून चालणारे लोक, जे या गोष्टींबाबत जास्तच अभिमानी आहेत, ते त्यावेळी तो उठाव करण्यासाठी होते काय? माझ्या या मालकांचं उदाहरण घ्या. ते खूप अभिमानी आहेत आणि आणि त्या उठावाबद्दल बढाया मारतात.विशेषतः त्यांचे पणजोबा स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये एक वीर म्हणून मृत्यू पावले होते, पण त्यात माझ्या मालकाचं कर्तृत्व काय? त्यांच्या पणजोबांना अभिमान बाळगण्याचा हक्क होता,पण यांना नाहीआहे.त्यांच्या पणजोबांनी बलिदान दिलं जेणेकरूनमाझे मालक, त्यांचे वारस,स्वतंत्र होऊ शकतील.पण आता ते स्वतंत्र आहेत तर ते त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर कसा करत आहेत? ते बाकीच्या लोकांचे ओंडके चोरतात,गाडीवर बसतात, आम्हाला गाडी ओढायला लावतात,स्वतः हातात लगाम घेऊन झोपा काढतात आणि आता ते लाकूड विकून दारू प्यायला गेले आहेत. काहीही न करता आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगत आहेत.माझ्या कितीतरी पूर्वजांचीत्याउठावादरम्यान सैनिकांना खायला देण्यासाठी कत्तल करण्यात आली होती आणि माझ्या पूर्वजांनी त्या काळात सुद्धा शस्त्रास्त्रं, अन्नधान्य, तोफा ओढून नेल्या होत्या आणि तरीही आम्ही त्यांच्या या कामगिरीबद्दलगर्वाने बोलत नाही, कारण आम्ही बदललो नाही आहोत, आम्ही आजही आमचं कर्तव्य करतो आहोत जसं आमच्या पूर्वजांनी केलं होतं,संयमाने आणि विचारपूर्वक.
त्यांना त्यांच्यापूर्वजांनी भोगलेल्या यातनांचा आणि आणि पाचशे वर्षांच्या गुलामगिरीचाअभिमान आहे. पण माझी प्रजाती तर आमच्या अस्तित्वापासूनच यातना सहन करत आली आहे आणि आजही आम्ही गुलामगिरीतच जगत आहोत आणि तरीही आम्ही त्याबद्दल जोरजोरात ओरडत नाही. ते म्हणतात की तुर्कांनी त्यांना त्रास दिला,त्यांची कत्तल केली, ठार मारलं! हो पण माझ्या पूर्वजांची तरसर्बियन आणि तुर्क दोघांकडूनही कत्तल करण्यात आली,जाळण्यात आलं,सर्व प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या.
त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान वाटतो पण ते त्यातील कशाचंही पालन करत नाहीत. माझा आणि माझ्या लोकांचा काय दोष आहे जे आम्ही ख्रिश्चन होऊ शकत नाही? त्यांचा धर्म त्यांना सांगतो की चोरी करू नये आणि इथे माझा मालक चोरी करून त्याच पैशांनी दारू पितो आहे. त्यांचा धर्म त्यांना सांगतो की शेजाऱ्यावर प्रेम करा आणि तरी ते एकमेकांना इजा करत आहेत. त्यांच्यासाठी माणसाचा सर्वात मोठा गुण म्हणजे आहे की जो दुसर्यांना त्रास न देणं. हो बरोबर आहे, पण कोणीही दुसऱ्याला काहीतरी चांगलं करण्याससांगतनाहीत, फक्त वाईट न करण्यास सांगतात.त्यांची सद्गुणांची व्याख्या इतक्या खालच्या थराला पोहोचली आहे. म्हणजे जी निरुपयोगी वस्तु जी दुसर्यांना त्रास देत नाही ती सुद्धा सद्गुणीच म्हणावी लागेल.
बैलाने एक दीर्घ श्वास सोडला, त्याच्या श्वासामुळे रस्त्यावरीलधूळवर उडाली.
– तर – बैल त्याचे दुःखद विचार पुन्हा करू लागला- याबाबतीत मी आणि माझी प्रजाती त्यांच्यापेक्षानक्कीच उत्तम आहे! मी कधीही कोणाचा खून केला नाही, मी कोणावर खोटे आरोप केले नाहीत, मी काही चोरलं नाही,मी सरकारी नोकरीतून निरपराध माणसांना काढलं नाही, मी देशाच्या तिजोरीमध्ये खड्डा केला नाही, मी खोटा हिशोब दाखवला नाही, मी निरपराध लोकांना अटक केली नाही, मी माझ्या मित्रांवर टीका केली नाही,त्यांचा अपमान केला नाही, मी माझ्या बैलतत्वांच्या कधी विरोधात गेलो नाही, मी खोटी साक्ष दिली नाही, मी कधी देशाचा मंत्री नव्हतो आणि देशाला कोणतीही हानी पोहोचवली नाही,आणि मी कोणालाइजा पोहोचवली नाहीइतकंच नाही तर जे इजा पोहोचवतात त्यांच्यासाठी चांगली कामंही केली. माझ्या आईने मला जन्म दिला आणि लगेच दुष्ट लोकांनी माझ्या आईचं दूध माझ्याकडून काढून घेतलं. देवाने किमान गवत तरीआम्हाला खायला ठेवलं आहे,जे माणूस खाऊ शकत नाही,तरीही आम्हाला ते सुद्धा कमी दिलं जातं.इतका त्रास, अपमानहोऊनसुद्धा आम्ही त्यांच्या गाड्या ओढतो, त्यांची शेतं नांगरतो,त्यांना धान्य देतो. तरीही कोणी आम्ही मातृभूमीसाठी केलेल्याया चांगल्या कृत्यांची दखल घेत नाही…
– आता उपवासाचंच उदाहरण घ्या; माणसांना धर्म सांगतो की सर्व सणाच्या दिवशी उपवास करावा, तरीही ते इतकासा उपवास सहन करू शकत नाहीत. मात्र मी आणि माझे लोक आयुष्यभर उपवासच करत असतात,अगदी तेव्हापासून जेव्हा आम्हाला आमच्या आईच्या स्तनांपासून दूर करण्यात आलं होतं.
बैलाने जणूकाहीप्रचंड दुःखात असल्याप्रमाणे मान खाली केली, नंतर पुन्हा वर उचललीआणिरागातच फुरफुरला. असं वाटत होतं की काहीतरी महत्त्वाचा विचार त्याच्या डोक्यात येतो आहे, त्याला त्रास देतो आहे, इतक्यात अचानक तो आनंदाने हंबरला:
– हो,मला आता समजलं, हे असंच आहे – आणि तो पुन्हा विचार करु लागला, – असंच असणार आहे;त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि नागरी हक्कांचा अभिमान आहे. मला याचा अजून गांभीर्याने विचार केला पाहिजे.
आणि तो विचार करु लागला, विचार करु लागला पण त्याला उत्तर मिळालं नाही.
– त्यांचे हेहक्क तरी आहेत? जर पोलीस त्यांना मत द्यायला म्हणाले तर ते मत देतात. असं तर आम्हीसुद्धा कोणी काहीही म्हणालं तरी मान हलवतो. पण जर त्यांना आज्ञा नसेल, तर ते मत देत नाहीत, किंवा राजकारणाचा विचारही करत नाहीत. आमच्याप्रमाणेच तेसुद्धा पूर्णपणे निरपराधी असतील तरी तुरुंगात मार खातात.किमान आम्ही आमची शेपूट हलवून हंबरू तरी शकतो पण त्यांनाइतकंसं करण्याचीही मुभा नाही आहे.
आणि याच क्षणी त्याचा मालक खाणावळीतून बाहेर आला. नशेमध्ये धडपडत,डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आणि काहीतरी न समजणारे शब्द बडबडत, अंदाज घेतघेत तोगाडीकडे चालत आला.
– हे पहा, हा एक इतिहासाचा अभिमान असलेला वंशज कशाप्रकारे त्याचं स्वातंत्र्य वापरतो आहे जे त्याच्या पूर्वजांनी आपल्या रक्ताची आहुती देऊन मिळवलं होतं?बरं, माझा मालक दारुड्या आणि चोर आहे, पणमग हे बाकीचे लोक स्वातंत्र्य कसं वापरत आहेत?स्वतः काही परिश्रम न करताफक्त त्यांच्या भूतकाळाचा,त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या कामाचा अभिमान बाळगत आहेत. पण आम्ही बैल,आमच्या पूर्वजांप्रमाणेच अजूनही परिश्रमी आणि कष्टकरी कामगार आहोत. आम्ही बैल आहोत, पण आम्ही आमच्या परिश्रमाचा आणि सदगुणांचा आजही अभिमान बाळगू शकतो.
बैलाने दीर्घ उसासा टाकला आणि जोखड घेण्यासाठी आपली मान तयार ठेवली.
बेलग्रेड मध्ये, १९०२.
“रदोये डोमानोविच” प्रकल्पासाठी अनुवादक अभिषेक शेट्ये, २०२०.