Tag Archive | दारिद्र्य

नेता (३/३)

(मागील पान)

अशाप्रकारे, पहिला दिवस गेला आणि पुढचे काही दिवस सुद्धा असेच गेले. काही महत्त्वाचं असं घडलं नाही, फक्त लहान-सहान गोष्टीच: ते आधी सरळचालत एका खड्ड्यात पडले, त्यानंतर एका दरीमध्ये;ते ब्लॅकबेरीच्या झुडपांवर घासले गेले;त्यांच्या पायात बरेच काटे रूतले; बर्‍याच जणांचे हात आणि पाय तुटले; काही जणांच्या डोक्यावर मार लागला. पण या सर्व यातना सहन केल्या गेल्या. काही वृद्ध प्रवाशांना रस्त्यावर मृतावस्थेत सोडून देण्यात आलं.“ते जर घरी थांबले असते तरीसुद्धा मेलेच असते.प्रवासामध्ये आले आहेत म्हणून असं झालं असं नाहीय!“वक्ता बाकीच्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देण्यासाठीम्हणाला.  काहीएक दोन वर्षांची लहान मुलं सुद्धा मरण पावली. पालकांनी त्यांच्या हृदयावर झालेलेहे घावमोठ्या कष्टाने सहन केले आणि हीच देवाची इच्छा आहे असं मानलं.“मुलं जितकी लहान, तितकं त्यांच्या मरणाचं दुःख कमी! जेव्हा ते अगदीच लहान असतात तेव्हा दुःख सर्वात कमी असतं. देवा, कोणत्या पालकांची मुलं लग्नाच्या वयात आल्यावर मरण नको पावू देत!जर मुलांच्या नशिबात मृत्यू असेल, तर तो आधीच आलेला बरा, त्यामुळे जास्त दुःखतरी होणार नाही!“ वक्त्यानेपुन्हा एकदा त्यांचं सांत्वन केलं. काहीजणांनी आपल्या डोक्याभोवती कपडे गुंडाळले होतेआणि आपल्या जखमांवर थंड पट्ट्या लावल्या होत्या.काहीजणांनीकपड्याचा पट्टा बनवून आपले हात गळ्याभोवती बांधून ठेवलेहोते. सगळ्यांचे कपडे फाटले आणि कापले गेले होते,चिंध्या होऊन लटकत होते, पण तरीही ते पुढे चालत राहिले. जर त्यांना सारखी भूक लागली नसती तर हे सगळं सहन करणं सोपं झालं असतं.

एका दिवशी काहीतरी वेगळंच घडलं.

नेता सर्वांच्या पुढे चालत होता, त्याच्याभोवती समूहामधील सर्वात शूर पुरुष होते.(त्यांपैकी दोघेजण उपस्थित नव्हते आणि ते कुठे गेले हेही कोणाला समजलं नाही. सर्वांनी असं गृहीत धरलं की ते हार मानून पळून गेले.एकदा वक्ताआपल्या भाषणात त्यांच्या विश्वासघाताबद्दल बोलला होता. पण फक्त काही जणांनाच असं वाटत होतं की ते दोघे प्रवासातच मृत पावले पण बाकीचे चिडतील म्हणून त्यांनी हे बोलून दाखवलं नाही.) बाकीचा समूह त्यांच्या मागून येत होता. अचानक त्यांच्यासमोर एक प्रचंड मोठी आणि खोल दरी आली. तिचा उतारच इतका तीव्र होता की पुढे एक पाऊल टाकणं सुद्धा शक्य नव्हतं. सर्वात हिंमतवान लोकसुद्धा थांबले आणि त्यांनी नेत्याकडे पाहिलं. कपाळावर आठ्या आणून विचारात गुंग झालेल्या आणिमान खालीच असलेल्या त्या नेत्याने धाडसानेएक पाय पुढे टाकला.आपल्या काठीने जमिनीवर त्याच्या नेहमीच्याच सवयीनुसार आधी उजवीकडे आणि मग डावीकडे टकटक केली. बऱ्याच जणांना त्याचं हे वागणं अजूनच विशेष आणि प्रतिष्ठेचंवाटायचं. त्याने कधीच कोणाकडे पाहिलं नव्हतं किंवा काही बोलला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील रेषा कधीही बदलल्या नव्हत्या आणि तो आता त्या दरीच्या जवळ जात असताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीतीनव्हती.जवळ असलेले सर्वात हिंमतवान पुरुषही मृत्यूच्या भीतीने कापू लागले तरी कोणाचीही त्या ज्ञानी नेत्याला थांबवण्याची हिंमत झाली नाही. अजून दोन पावलं टाकून तो दरीच्या अगदी कडेला आला होता. जिवाच्या भीतीने ते सगळे हादरून गेले, पुढे असलेले पुरुष तर त्याला खेचायला तयारच होते,जरी त्यामुळे त्यांच्या नियमांचा भंग झाला असता तरी. त्या नेत्याने अजून एक पाऊल टाकलं आणि तो दरीमध्ये दिसेनासा झाला. सगळीकडे गोंधळ,आरडाओरडा सुरू झाला. सर्व लोकांमध्ये भीती पसरली. काहीजण पुन्हा मागे जाऊ लागले.

– थांबा,बंधुंनो! कसली घाई आहे?तुम्ही तुमचा शब्द असा पाळणार आहात का?आपणन घाबरता या ज्ञानी माणसाच्या मागे गेलं पाहिजे, कारण त्याला तो काय करतोय हे माहीत आहे.तो काही स्वतःला इजा करून घ्यायला वेडा नाही आहे.कदाचित ही दरी म्हणजेच सर्वात मोठा आणि शेवटचा अडथळा असेल. कुणास ठाऊक, कदाचित याच्या पलीकडेदेवाने आपल्यासाठी अतिशयउत्तम आणि सुपीक अशी जमीन ठेवली असेल. चला पुढे! त्याग केल्याशिवायसहज तरकाहीही मिळत नाही! – वक्ता हे शब्द म्हणाला, त्याने दोन पावलं पुढे टाकली आणि तोही दरीमध्ये दिसेनासा झाला.

बाकीचे हिंमतवान लोकही त्याच्या मागोमाग गेले आणि मग सगळेच खाली जाऊ लागले. त्या खडकाळ दरीमध्ये ओरडण्याचा, कळवण्याचा, रडण्याचा, आपटण्याचा,कण्हण्याचा आवाज घुमू लागला. त्या ठिकाणाहून कोणीही जिवंत बाहेर येऊ शकत नाही असंच वाटत होतं, मग काहीही इजा न होता अगदी व्यवस्थित बाहेर येणं तर अशक्य होतं. पण मानवी जीव खूप हट्टी असतो. नेता यावेळी अगदी विलक्षण पद्धतीने नशीबवान ठरला, तो पडत असतानाचत्याला झुडपांना पकडून ठेवता आलं, त्यामुळे त्याला काही इजा झाली नाही. त्याने स्वतःला वर खेचून बाहेर येण्यात यश मिळवलं. खाली जेव्हा कळवळण्याचा, ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज घुमत होता, तेव्हा तो बाहेरयेऊनआधीसारखाचशांतपणे विचार करत बसला.गंभीर जखमा झालेले बरेच जण खूप रागावले, आणि त्याला शिव्याशाप देऊ लागले. पण तो काहीच बोलला नाही. जे लोक झुडूपं किंवा झाडांना पकडण्यात यशस्वी झाले होते ते पुन्हा बाहेर येण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. काहीजणांची डोकीफुटली होती, त्यांच्या चेहर्‍यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तिथेत्या नेत्याला सोडून कोणीचपूर्णपणे ठीक नव्हतं. वेदनेने कळवळत असतानाच,सर्वांची त्याच्याकडे पाहण्याची नजर बदलली. पण त्याने त्याची मान जराही वर केलीनाही,तोएखाद्या तपस्व्याप्रमाणे शांतचबसून राहिला.

काही काळ गेला आणि प्रवाशांची संख्या अजून कमी होत गेली. प्रत्येक दिवशी काहीतरी घडत होतं. काहीजण हा प्रवास सोडून पुन्हा मागे गेले.

सुरुवातीला असलेल्या प्रचंड संख्येमधून आता फक्त सुमारे वीस जण उरले होते. त्यांचे निस्तेज आणि मळलेले चेहरे भीती,आशंका,थकवा आणि भूक या सर्व भावना दर्शवत होते. पण कोणीही एक शब्दसुद्धा बोललं नाही.ते त्यांच्या नेत्याप्रमाणेच शांत राहिले आणि त्याच्या मागोमाग चालू लागले. आधी उत्साही असलेला वक्तासुद्धा आता नाराजीने मान हलवत होता. रस्ता अत्यंत कठीण होता.

त्यांची संख्या प्रत्येक दिवशी कमी होत गेली आणि शेवटी दहावर आली. नैराश्याने भरलेल्या चेहऱ्यांनी ते एकमेकांशी बोलताना फक्त तक्रारीच करत होते.

ते पूर्णपणे अपंग झाले होते. त्यांच्यापैकी काहीजण हातातकुबड्या घेऊन चालत होते. काहीजणांनी त्यांचे हात गळ्याभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये अडकवले होते. त्यांच्या हातांवर जागोजागी पट्ट्या बांधल्या होत्या.त्यांची अजूनत्रास सहन करण्याची तयारी असली तरी ते करू शकत नव्हते, कारण त्यांच्या शरीरावर आता जवळजवळ कुठेच नवीन जखमांसाठी जागा उरली नव्हती.

त्यांच्यापैकी सर्वात शूर आणि ताकदवानलोकांचासुद्धा आत्मविश्वास कमी झालाहोता. तरीही ते संघर्ष करत चालत होते, बरेच प्रयत्न करून,शिव्याशाप देत वेदनेने कळवळत मागून जात होते. अजून काय करू शकणार होतेते?इतकं सहन केल्यानंतर हा प्रवास सोडून परत मागे जाणं शक्य नव्हतं.

संध्याकाळ झाली!कुबड्या घेऊन लंगडत चालत असताना त्यांना अचानक दिसलं की नेता त्यांच्यासमोर नव्हता, अजून एक पाऊलपुढे, आणि ते सगळे पुन्हा एका दरीमध्ये घसरून पडले.

– ओह,माझा पाय! माझा हात! – कण्हण्याचा, रडण्याचा, ओरडण्याचा आवाजपुन्हा घुमू लागला.एका बारीकशाआवाजाने त्या ज्ञानी नेत्याला शिव्या दिल्या पण तो आवाजलगेच शांत झाला.

जेव्हा सूर्य वर आला, तेव्हा नेता समोरच बसला होता,अगदी तसाच जसातो त्यांना पहिल्या दिवशी दिसला होता. त्याच्यामध्ये काहीही फरक पडला नव्हता.

तो वक्ता दरीतून बाहेर आला, त्याच्यामागोमाग अजून दोन जण आले.हातापायांना जखमा झालेले, रक्ताने माखलेले तेतीन प्रवासी मागे वळून अजून कितीजण उरले आहेत ते पाहू लागले,पण आता फक्त तेच राहिले होते.त्यांचं हृदयनैराश्याने आणि मृत्युच्या भीतीने पिळवटून गेलं. हा प्रदेश अनोळखी होता,खडकाळ,डोंगर-दर्‍या असलेला – इथे कुठेच वाट नव्हती. दोन दिवसांपूर्वी ते एका पायवाटेजवळ आले होते, पण त्यांनी ती वाट सोडून दिली. त्यांचा नेता त्यांना या रस्त्याने घेऊन आलाहोता. ते या प्रवासामध्ये मृत्यू पावलेल्या अनेक मित्रांचा आणि नातेवाईकांचा विचार करू लागले.वेदनेपेक्षा भयंकर असलेल्या दुःखाने त्यांच्यावर मात केली. त्यांना त्यांचा स्वतःचा विनाश स्वतःच्या डोळ्यांनी दिसला होता.

तो वक्ता नेत्याच्या जवळ गेला आणि थकलेल्याव वेदनेने थरथरणाऱ्या आवाजात बोलू लागला.

– आपण आता कुठे जात आहोत?

नेता शांतच होता.

– तुम्ही आम्हाला कुठे नेत आहात आणि तुम्ही आम्हाला कुठे आणलं आहे? आम्ही स्वतःला आणि आमच्या कुटुंबांना तुमच्या हातात सोपवलं होतं. आमची घरं आणि आमच्या पूर्वजांच्या आठवणींना मागेच सोडून तुमच्या सोबत आलो होतो, जेणेकरून आम्ही त्या नापिक जमिनीमध्ये मरून जाणार नाही. पण तुम्ही आमची अवस्था अजूनच दयनीय केली आहे. तुमच्या मागे दोनशे कुटुंबं होती आणि आता पहा किती जण उरले आहेत ते!

– म्हणजे सगळेजण इथे नाही आहेत?नेता मान वर न उचलता कुजबुजला.

-तुम्ही हा प्रश्न विचारू तरी कसा शकता?मान वर करा आणि पाहा!या दुर्दैवी प्रवासामध्ये आमच्यापैकी कितीजण उरले आहेत ते मोजा! आणि आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत हे पहा! अशाप्रकारे अपंग होण्यापेक्षा,आम्ही मारून गेलो असतो तर बरं झालं असतं.

– मी तुमच्याकडे पाहू शकत नाही!

– का नाही?

– मी आंधळा आहे.

एक दीर्घ शांतता.

– तुमची दृष्टीया प्रवासामध्ये गेली का?

– मी जन्मापासूनच आंधळा आहे!

तिघांनीही प्रचंड दुःखामध्ये आपलं डोकं पकडलं.

थंडगार वारा भयंकरपणे त्या खडकांतून वाहू लागला. त्याबरोबर काही सुकलेली पानं वाहत आली. टेकडीवर धुकंजमायला सुरुवात झाली आणि त्या थंड, धुरकट हवेतून गिधाडांचे पंख फिरू लागले.अगदी दुर्दैवी असाएकचीत्कार घुमला. सूर्य ढगांच्या पलीकडे लपला होता,जे वेगाने दूर आणि दूर निघून जात होते.

तिघांनीही एकमेकांकडे अतिशय भीतीने पाहिलं.

– आता आपण कुठे जायचं?– एकानेघाबरत विचारलं.

– माहीत नाही!

 

बेलग्रेड मध्ये, १९०१.
रदोये डोमानोविच प्रकल्पासाठी अनुवादक अभिषेक शेट्ये, २०२०.

नेता (१/३)

– ­बंधूंनो आणि मित्रांनो, मी तुम्हा सर्वांची भाषणं ऐकली आहेत, आणि तुम्ही आता माझं ऐकावं अशी मी विनंती करतो. जोवर आपण या ओसाड प्रदेशातच राहत आहोत तोवर आपल्या या सर्व चर्चा आणि वादविवाद व्यर्थ आहेत. या रेताड जमिनीमध्ये आणि या खडकांमध्ये जेव्हा पाऊस होता त्यावेळीही काही पिकू शकलं नाही, तर आताच्या, सर्वात तीव्र असलेल्या या दुष्काळात इथे काहीही पिकणं अगदीच अशक्य आहे. आपण किती वेळ असे एकत्र येऊन आपली रडगाणी गाणार आहोत? गुरं अन्नाशिवाय मरत आहेत, आणि लवकरच आपल्याला आणि आपल्या मुलांनाही खायला मिळणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा उपाय शोधला पाहिजे जो उत्तम आणि अमलात आणण्याजोगा असेल. मला वाटतं आपण ही उजाड जमीन सोडून बाहेरच्या जगात गेलं पाहिजे जिथे चांगली आणिसुपीक माती असेल, कारण अशा अवस्थेत तर आपण फार काळ जगू शकणार नाही.

अशाप्रकारे एका ओसाड भागातला एक रहिवासी एका सभेमध्ये अगदी थकलेल्या आवाजात बोलला होता. कधी आणि कुठे हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा की असं कुठल्यातरी प्रदेशात फार काळापूर्वी घडलं होतं, आणि तेच महत्त्वाचं आहे. खरंसांगायचं तर, एकदा मला वाटू लागलं की ही गोष्ट मीच तर तयार केलेली नाही ना, पण हळूहळू मी स्वतःला त्या विचित्र विचारातून मुक्त केलं. आता माझा ठाम विश्वास आहे की मी या कधीतरी कुठेतरी प्रत्यक्षात होऊन गेलेल्या घटनेचा इथे संदर्भ देऊ शकतो जी मी अजिबात माझ्या कल्पनेतून तयार केलेली नाही.

आपले हात खाली ठेवून, खिन्न, गोंधळलेल्या नजरेने पाहत,उदास व निस्तेज चेहर्‍याने समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहर्‍यावर या विद्वत्तापूर्ण शब्दांमुळे थोडी तरतरी दिसू लागली. सगळेजण लगेच कल्पनेत हरवून गेले की ते एका जादुई, स्वर्गीय प्रदेशामध्ये आहेत जिथे जीवतोड मेहनतीचं फळ म्हणून खूप जास्त पीक मिळत आहे.

– ­बरोबर आहे! बरोबर आहे! – सर्व बाजूंनी थकलेल्या आवाजात कुजबूज सुरू झाली.

– ही जागा कुठे जवळ आहे का? – एका कोपर्‍यातून हळूच आवाजात प्रश्न विचारला गेला.

–बंधूंनो! – अजून एकजण काहीशा खणखणीत आवाजात बोलू लागला. – आपण लगेचच हा सल्ला अंमलात आणला पाहिजे कारण आपण असे फार काळ जगू शकणार नाही. आपण खूप परिश्रम करून स्वतःला त्रास करून घेतला, तरीही काही फायदा झाला नाही. आपण पेरणी केली ज्यातून आपल्याला काहीतरी खायला मिळू शकलं असतं पण पूर आला आणि मातीसकट सर्वकाही वाहून घेऊन गेला, ज्यामुळे आता फक्त हे खडक उरले आहेत. आपण सकाळ संध्याकाळ परिश्रम करूनही तहानलेले आणि भुकेलेलेच आहोत, विवस्त्र आणि अनवाणीच आहोत. तरीही आपण इथेच राहायचं का? आपल्याला इथून बाहेर पडून चांगली सुपीक जमीन शोधली पाहिजे जिथे आपल्या परिश्रमांचं फळ म्हणून आपल्याला भरभरून पीक मिळेल.

– चला! लवकर चला! कारण ही जागा आता राहण्यालायक राहिली नाही आहे.

कुजबूज वाढू लागली, आणि प्रत्येकजण चालू लागला,आपण कुठे जातोय हे न पाहताच.

– थांबा, बंधूंनो! कुठे जाताय तुम्ही?– पहिला वक्ता पुन्हा बोलू लागला. – हो, बाहेर जायचंच आहे, पण असं जायचं नाहीय. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपण कुठे जातोय. नाहीतर आपण यापेक्षाही कठीण परिस्थितीमध्ये अडकू. मला वाटतं आपण एक नेता निवडला पाहिजे, ज्याचं सर्वांना ऐकावं लागेल आणि जो आपल्याला सर्वात उत्तम आणि अचूक मार्ग दाखवू शकेल.

– हो, निवडा! लगेच कोणालातरी निवडा! – चहूबाजूंनी आवाज येऊ लागला.

पण यावेळी आवाज वाढू लागला, गोंधळ झाला. प्रत्येकजण बोलत होता आणि कोणीच ऐकत किंवा ऐकू शकत नव्हतं. ते वेगवेगळ्या गटांत विभाजित होऊ लागले, प्रत्येकजण स्वतःशीच बोलत होता आणि नंतर हे गटसुद्धा विभागले गेले. आता दोघादोघांच्या जोड्यांमधून लोक बोलू लागले, आपलं म्हणणं पटवून देऊ लागले, एकमेकांच्या हातांना धरून खेचू लागले, आणि आपल्या हातांनी दुसर्‍यांना शांत राहण्याच्या खुणा करू लागले. सर्वजण एकत्र आले, अजूनही बोलत.

– बंधूंनो! – अचानक एक खणखणीत आवाज घुमला, ज्यामुळे बाकीचे कुजबुजणारे, निस्तेज आवाज विरून गेले. – आपल्याला अशाप्रकारे काहीच ठरवता येणार नाही. प्रत्येकजण बोलतो आहे आणि कोणीच ऐकत नाहीय. आपल्याला एक नेता निवडायचा आहे. आपल्यातून आपण कोणाला निवडू शकतो? आपल्यातल्या कोणी इतका प्रवास केला आहे ज्याला रस्ते माहीत असतील? आपण सगळे एकमेकांना चांगले ओळखतो, पण तरीही मी स्वतःला आणि माझ्या मुलांना इथल्या कोणाच्याही नेतृत्वाखाली ठेवू शकत नाही. त्यापेक्षा, मला सांगा आज सकाळपासून त्या रस्त्याच्या कडेला सावलीत बसलेल्या त्या प्रवाशाला कोण ओळखतं?

शांतता पसरली. सगळे त्या अनोळखी व्यक्तीकडे वळले आणि त्याला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळू लागले. मध्यमवयीन, खिन्न चेहरा, जो वाढलेल्या केस आणि दाढीमुळे नीट दिसतही नव्हता असा तो प्रवासी तसाच शांत बसून राहिला, विचारात हरवून जाऊन मध्येच आपली मोठी काठी जमिनीवर आपटत होता.

– काल मी त्याच माणसाला एका लहान मुलाबरोबर पाहिलं होतं. त्यांनी एकमेकांचा हात पकडला होता आणि रस्त्यावरून चालत जात होते. आणि काल रात्री तो मुलगा गाव सोडून गेला पण हा माणूस इथेच थांबला.

– बंधू, या क्षुल्लक गोष्टींवर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीय. तो जो कोणी असेल तो फार दूरवरून इथे आला आहे कारण आपण कोणीच त्याला आधी पाहिलं नाहीय. आणि त्याला इथून जाण्याचा सर्वात अचूक रस्ता नक्कीच माहीत असेल. मला असं जाणवतंय की तो खूप ज्ञानी मनुष्य आहे कारण तो शांतपणे तिथे बसून विचार करतो आहे. दुसरं कोणी असतं तर इतक्यात दहा वेळा त्याने आपल्या बोलण्यात व्यत्यय आणला असता किंवा इतक्यात आपल्यातल्या कोणा एकाशी बोलूसुद्धा लागला असता. पण तो बराच वेळ तिथे एकटाच बसून आहे आणि काहीच बोलत नाहीय.

– तो शांतपणे बसला आहे म्हणजे अर्थातचतोगहन विचार करतो आहे. तो नक्कीच एक ज्ञानी मनुष्य असला पाहिजे. – बाकीच्यांनी दुजोरा दिला आणि पुन्हा त्या माणसाचं निरीक्षण करू लागले. प्रत्येकाला त्याच्यामध्ये तो खूप बुद्धिमान असल्याची खात्री करून देणारा काहीतरी वेगळा गुण दिसत होता.

बोलण्यात अजून जास्त वेळ घालवायचा नव्हता, म्हणून शेवटी सर्वांनी ठरवलं की या प्रवाशालाच जाऊन विचारावं, ज्याला देवाने त्यांना नवी सुपीक जमीन शोधण्यात मदत व्हावी म्हणून पाठवलं आहे असं त्यांना वाटत होतं. तोच त्यांचा नेता बनला पाहिजे आणि ते काहीही प्रश्न न विचारता म्हणणं ऐकतील.

त्यांनी त्यांच्यातल्या दहा जणांना निवडलं जे त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्यांचा निर्णय सांगणार होते. त्याला त्यांच्यावर आलेल्या दयनीय परिस्थितीची माहिती करून देणार होते आणि त्यांचा नेताबनण्याची विनंती करणार होते.

म्हणून दहा जण पुढे गेले आणि त्याच्यासमोर नम्रतापूर्वक झुकले. त्यांच्यातला एकजण तिथली नापीक जमीन, दुष्काळी वर्षं आणि त्यांच्या करूणाजनक परिस्थितीबद्दल बोलू लागला. त्याने त्याचं बोलणं असं पूर्ण केलं:

– या परिस्थितीमुळे आम्हाला आमचं घर आणि आमची जमीन सोडून बाहेरच्या जगात चांगल्या जमिनीच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. यावेळी जेव्हा आम्ही एका निर्णयापर्यंत पोहोचलो तेव्हा देवानेच आमच्यावर कृपा केली असं दिसतंय. कारण त्याने तुम्हाला पाठवलंय. एका ज्ञानी आणि बुद्धिमान मनुष्याला. जो आमचं नेतृत्व करून आमची या संकटातून सुटका करेल. इथल्या सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही तुम्हाला आमचा नेता बनण्याची विनंती करतो. तुम्ही जिथेही जाल, आम्ही सोबत येऊ. तुम्हाला रस्ते माहीत आहेत, आणि नक्कीच एखाद्या चांगल्या प्रदेशात तुमचा जन्म झाला असेल. आम्ही तुमचं नीट ऐकू आणि तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू. तर हे ज्ञानी मनुष्या, तुम्ही इतक्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार आहात का? तुम्ही आमचा नेता बनाल का?

या विनंतीपूर्ण भाषणामध्ये त्या ज्ञानी माणसाने एकदाही त्याचं डोकं वर उचललं नाही. संपूर्ण वेळ तो तसाच बसला होता जसं त्यांनी त्याला पाहिलं होतं. त्याचं डोकं खाली झुकलं होतं, कपाळावर आठ्या होत्या, आणि तो काहीच बोलला नाही. तो फक्त वेळोवेळी त्याची काठी जमिनीवर आपटत विचार करत होता. जेव्हा हे भाषण संपलं तेव्हा तो जराही न हलता तुटकपणे म्हणाला:

– हो.

– मग आम्ही तुमच्यासोबत येऊन नवीन जागा शोधू शकतो का?

– हो. – मान वर न करता त्याने उत्तर दिलं.

सर्वांमध्ये उत्साह पसरला सगळे त्याचे आभार मानू लागले, पण तो मनुष्य त्यांच्याशी काहीही बोलला नाही.

ते दहा जण परत येऊन सर्वांना ही चांगली बातमी सांगू लागले आणि म्हणाले की आताच त्यांना या मनुष्याच्या महान बुद्धिमत्तेचा साक्षात्कार झाला.

– तो त्याच्या जागेवरून हलला सुद्धा नाही किंवा आपण कोणाशी बोलतोय हेही त्याने पाहिलं नाही. तो शांत बसून विचारच करत राहिला. आम्ही इतकं बोललो आणि त्याचं कौतुक केलं पण तो फक्त दोन शब्दच बोलला.

– महान मनुष्य! विलक्षण बुद्धिमत्ता! – सर्वजण आनंदाने ओरडू लागले आणि म्हणू लागले की प्रत्यक्ष देवानेच त्यांना वाचवण्यासाठी या महान मनुष्याला स्वर्गातून या प्रदेशात पाठवलं आहे. सर्वांना खात्री झाली की जगातील कोणत्याही गोष्टीमुळे मानसिक शांती भंग होऊ न देणार्‍या अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली त्यांना नक्कीच यश मिळेल. आणि त्यांनी दुसर्‍याच दिवशी पहाटे त्या प्रदेशातून निघण्याचा निर्णय घेतला.

(पुढील पान)